नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यासाठी उशीर झाला होता. तरीही त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आता उमेदवारी अर्ज माघारी आणि छाननी झाल्यानंतर प्रचाराला नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये रंग चढू लागला आहे. या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी दुपारी नाशिक दौऱ्यावर येत असून, यावेळी ते नाशिकमध्ये महायुतीच्या पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, शिवसेना शहराध्यक्ष बंटी तिदमे, राकपाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
ऐन प्रचाराच्या धामधुमीत होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्री काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.