मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका आमदारांना बसला आहे. अधिवेशनसाठी अनेक आमदार एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येत होते. पण, जोरदार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसोबत आमदारांना देखील सहन करावा लागला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील १० ते १२ आमदार अडकल्याची माहिती आहे.
अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकले आहेत. विदर्भ, अमरावती एक्स्प्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली आहे. यावेळी १० ते १२ आमदार ट्रेनमध्ये होते. आमदार अमोल मिटकरी, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ट्रँकनं चालत बाहेर निघाले आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज सकाळी ११ वाजता विधानसभा कामकाज सुरु होणार आहे.अतिवृष्टीमुळे आमदार व मंत्री पोहचले नसल्यास कामकाज काही वेळेसाठी स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहेत. दोन दिवसांची सुट्टी असल्याने बहुतांशआमदार आणि मंत्री हे आपापल्या मतदारसंघात गेले होते. सोमवारी अधिवेशन असल्याने अनेक आमदार रेल्वेने मुंबईला निघाले होते. महालक्ष्मी एक्सप्रेस मध्येही अनेक आमदार अडकले आहेत. बाहेरुन येणाऱ्या गाड्या मध्येच थांबल्याने मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांची रेल्वे ट्रॅकवरुन पायपीट झाली आहे.
संजय बनसोडे हेही लातूर येथून येणाऱ्या ट्रेनमध्ये अकडले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मंत्री हसन मुश्रीफअडकले आहेत. विधिमंडळचे आजचा कामकाज रद्द करावी अशी मागणी अनेक आमदाराने विधानसभाअध्यक्षांकडे केली आहे.
आमदार आणि मंत्र्यांची अनुपस्थिती पाहता आजचे कामकाज कसे होते हे पाहणं आता महत्वाचे ठरेल.