बिग बॉस हिंदी सीझन 17 चा विजेता आणि स्टँडअप कोमेडियन मुनव्वर फारुकी हा पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्टँडअप कॉमेडी शोच्या माध्यमातून मुनव्वर फारुकी हा प्रसिद्धी झोतात आला. त्याच्या शोला अगदी हाऊसफुल्ल असा प्रतिसाद देखील कायम मिळतो. तसेच सोशल मीडियावरही त्याचे रिल हे बरेच व्हायरल होतात. त्यामुळे त्याचा एक मोठा चाहतावर्ग आता तयार झाला आहे. पण इतका प्रतिसाद मिळूनही मुनव्वर आता एका वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं चित्र आहे. कारण मुनव्वरच्या एका स्टँडअप कॉमेडीच्या शोवरुन आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुनव्वरच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांना विचारतो की, सगळे मुंबईचेच आहेत ना? इथे येण्यासाठी कुणी प्रवास करुन आलं आहे का? त्यावर प्रेक्षकांमधून एकाने उत्तर दिलं की, मी तळोजावरुन आलोय. आज मी विचारलं तर तळोजा वेगळं झालं आणि जेव्हा यांच्या गावचे लोक विचारतात की, कुठे राहतात, तेव्हा हे लोकं सांगतात की आम्ही मुंबईला राहतो. ही कोकणी माणसं सगळ्यांना च#$ बनवतात. मुनव्वरच्या या जोकवर प्रेक्षकांमधूनही टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला.
मुंबईतील एका स्टँडअप कॉमेडीच्या कार्यक्रमात त्याने मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे आता मुनव्वरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर आता मुनव्वरवर काही कारवाई होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.