राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे. आम्ही विकृतीचे विरोधक आहोत. कोणत्याही राजकीय पक्षांचा नाही तर सर्व नागरिकांच्यावतीने उद्याचा बंद आम्ही करत आहे. सर्व भेद विसरून उद्या बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केले आहे.
महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. उद्याचा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या लोकल आणि बससेवा बंद ठेवण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत झालेल्या बंदप्रमाणेच उद्या बंद झाला पाहिजे. अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सण उत्सव आहे म्हणून दुपारी 2 पर्यंत बंद करावा. सरकारला काही ही बोलू दे, जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे. लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवा. राज्यातील सुजाण नागरिकांना सांगतो उद्या 2 पर्यंत कडकडीत बंद पाळावा.
पोलिसांनी दादागिरी करू नका : उद्धव ठाकरे
लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवी, पोलिसांनी दादागिरी करू नका. तसेच सरकारने, सत्ताधारींनी आततायीपण करु नये. पोलिसांनी दादागिरी करू नये. उद्याचा फज्जा उडवायचा प्रयत्न करू नका नाहीतर जनता दोन महिन्याने फज्जा उडवेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
राज्यात काय सुरू काय बंद राहणार?
वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु राहतील औषधे, रुग्णालये सुरू राहणार आहे.