राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोल्हापुरात पार पडली या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आज जे काही बघतो आहोत, मी इथे नन्नाचा पाढा लावायला आलो नाही. पण अडीच वर्ष भोगत आलो ते व्यक्त करायला आलोय. खोके सरकार आहे. जिथे मिळेल तिथे खात आहे. रस्त्यातही खात आहे. आपलं सरकार असताना पुण्याच्या रिंगरोडची संकल्पना आपली होती. आपण ज्या रकमेला मंजुरी दिली त्यापेक्षा कितीतरी पटीने रक्कम मंजूर केली, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्या पाच वर्षात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. महागाई वाढू दिली नव्हती. आमचं सरकार आलं तर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, अशी घोषणा करतो. त्यात डाळ, तांदूळ, साखर, तेल आलं जे काही लागते त्याचे भाव स्थिर ठेवून दाखवणारच. सरकारही स्थिर आणि भावही स्थिर ठेवू. नुसतं तुम्ही कोपराला गूळ लावता. लोकांना भरकटून टाकता. महाराष्ट्र गुजरातला विकून टाकायचा. मी काही गुजरातच्या विरोधात नाही. महाराष्ट्रातील हक्काचं, जे आहे तो त्यांच्या तोंडचा घास ओरबाडून गुजरातला देणार असाल तर आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.