सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. यामुळे मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
त्यातच आता या प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाळाच घोटाळा झाल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले. आता तरी भ्रष्टाचार समोर आला आहे. भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली, असे अंजली दमानिया म्हणाल्या. यावर आता धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान यावर धनंजय मुंडेंनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख प्रकरणासह अंजली दमानियांनी केलेल्या विविध आरोपांवर स्पष्टपणे भाष्य केले. देशाच्या इतिहासात ५९ दिवस एका माणसाचं आणि एका जिल्ह्याचं, एका जातीचं, एका गावाचं मीडियाकडून ट्रायल होत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
“जर मुख्यमंत्र्यांचे अधिकार त्यांना माहीत नसेल आणि दमानियाला माहीत असेल यावर तुम्ही विश्वास ठेवाल. तुमच्या संपादकाचे अधिकार संपादकाला माहीत नाही आणि आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी येऊन म्हणावं, तुम्ही म्हणताय संपादकाला अधिकारच नाही. हे मान्य कराल. काय चाललंय. हे गुड जर्नालिझम? माझं राजकीय आयुष्य का संपवण्याचा प्रयत्न करताय”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
“माझं राजकीय आयुष्य हे जनतेच्या हातात आहे. देशाच्या इतिहासात ५९ दिवस एका माणसाचं आणि एका जिल्ह्याचं, एका जातीचं, एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं. ५९ दिवसात एवढ्या मोठ्या गोष्टी देशात घडल्या. त्याची काही तास न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही. पण आमचं ५९ दिवस चालतं. मला याबाबत कोण आहे, काय नाही. हे शोधा”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया आणि अजित पवार यांच्या भेटीवरही भाष्य केले. “ज्यांच्यावर आरोप करत होत्या. त्यांच्या दारावर जावं लागतं. माझ्या लीडरवर केलेले आरोप खरे ठरले नाही. आता माझ्याच नेत्याकडे माझ्याविरोधात आरोप करावे लागतात. ठिक आहे ना. मी माझ्या पक्षाच्या डायसवर येऊन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासमोर सर्व सांगितलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जे जे काही चाललंय ते सांगितलं आहे. एखाद्याला अशा पद्धतीने एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि बदनाम करायचं. काहींना अवघड केलं असं वाटत असेल. या संवैधानिक पदावरून मोकळं पडलं तर सर्व सारखेच आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.
अंजली ताईंचे सर्व मुद्दे त्या याचिकेत होते
“एक महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घ्या. या खरेदीबाबत अंजलीताईंनी जे आरोप केले. हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठात गेला होता. हेच आरोप केले. जेव्हा सुनावणी झाली. तेव्हा कोर्टाने सांगितलं पॅरा कमी करा. ठेकेदाराला सर्व पॅरा कमी करावा लागले. अंजली ताईंचे सर्व मुद्दे त्या याचिकेत होते. खंडपीठाने एक प्रकरण खंडपीठात सुरू ठेवलं. ते विथ ड्रॉ करा सांगितलं. दर तफावती बाबत त्या याचिकेत होतं. तो पॅराही कमी करायला लावला आहे”, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.