शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यात एकमत नसल्याचीही टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावरून मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
संजय राऊत यांनी आपली लंगोट सांभाळावी नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवावे. संजय राऊत स्वतः एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत हे किती काळ उबाठामध्ये राहतात याचे दिवस मोजा, असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
दरम्यान ठाकरे गटात आदित्य ठाकरेंबद्दल नाराजी आहे. आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे गटात जी खदखद आहे त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावे, असा सल्ला देखील नितशे राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
दुसऱ्याच्या घरात काय होतं यापेक्षा मातोश्रीला मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत. किती उपवास ठेवले जातात, यावर सुद्धा संजय राऊत यांनी लेख लिहावे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने किती बुवांकडे ते गेले याची माहिती महाराष्ट्राला द्यावी, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.