उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर ? म्हणाले...
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर ? म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
विधानसभा तोंडावर असताना राजकारणात अनेक घडामोडी  घडत  आहेत , आणि त्याचबरोबर सत्तास्थापनेचे तर्क वितर्क , आरोप - प्रत्यारोप आणि अजून बऱ्याच छोट्या मोठ्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सध्या सर्वच पक्ष हे महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठीची जोरदार तयारी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. नुकतंच उद्धव ठाकरेंची शिर्डीत एक जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली . 

मागच्या महिन्यात महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधीच जाहीर करावा, अशी मागणी महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांसमोर केली होती, पण आता महिन्याभरातच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण शिर्डीमध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या महाअधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

‘ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेनेवर आईवर हे वार करू शकतात, तर हे तुमच्यावर वार नाही करू शकणार? म्हणून मला हे सरकार नकोय. मला मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आतासुद्धा पडत नाहीये, पण मला सत्तेतून कुणीही निवृत्त करू शकत नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच ज्यांना आपल्याला बहीण आहे हे माहिती नव्हतं त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

‘माझा पक्ष आणि वडील चोरले तरीही तुम्ही माझ्याकडे मागत आहात. माझ्याकडे काही नाही तरी तुम्ही मागताय. मेरे पास इमान है. मी पुन्हा सत्तेत येणार आणि तुम्हाला न्याय देणार. फाटाफुटीचं राजकारण जसं शिवसेनेसोबत केलं तसं तुमच्यातही करतील. हे काय पेन्शन देणार? यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवा. जशी तुमची जुनी पेन्शनची मागणी आहे, तरी माझी तुमच्याकडे एक मागणी आहे. निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर केली तर मत देणार का?’, असं उद्धव ठाकरेंनी विचारलं.

‘तुम्ही महाविकासआघाडीला सत्तेवर आणा, मी मागणी पूर्ण करतो. ज्यांचा जन्मच गद्दारीतून झाला ते तुमच्याशी काय प्रामाणिक राहणार? आम्ही राजकारणात कंत्राटी कामगार आहोत, कंत्राटी कामगारांना 50 खोके मिळत असतील तर तुम्हाला का नको? दुर्दैवाने मी मुख्यमंत्री असताना कोरोना आला, नाहीतर आज तुम्हाला जमण्याची वेळ आली नसती. तुमचे कापलेले दहा टक्के यांच्या मित्राच्या खिशात जातात’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group