नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सप्तशृंगगडावरील यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी नांदुरी बस स्थानकावर आलेल्या तिघा प्रवाशांचे अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. कळवण पोलिसांनी पुढील तपास करून संशयित आरोपी आकाश मोहन डुकरे (वय 27, रा. विजयनगर, पाथर्डी, जि. अहमदनगर) व अशोक किसन जाधव (वय 32, रा. द्वारका, नाशिक) या दोघांना अटक केली आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये संजय गलांडे (वय 20, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांची दीड लाख रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, तसेच अंकित बन्सीलाल कोचर, रा. पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) यांची 50 हजार रुपये किमतीची 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि हर्षल अजित धाडीवाल (रा. लासलगाव, ता. निफाड) यांची 50 हजार रुपये किमतीची 12 ग्रॅम वजनाची चपटी गोल डिझाईन असलेली सोन्याची चेन यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून, भा. दं. वि. कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास कळवणचे पोलीस हवालदार बत्तिसे हे करीत आहेत.