'आनंद'मूर्ती हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन
'आनंद'मूर्ती हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन
img
Dipali Ghadwaje
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री सीमा देव यांनी विविध चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता.

दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. रमेश देव आणि सीमा देव या दोघांकडेही सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहात होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे.

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. आनंद या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. 

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्यं आहेत. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर आज सीमा देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group