मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. या काळात सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असं जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांनी सरकारला दिलेली मुदत काल संपली. मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे.
त्यांच्या या आंदोलनाला आता मराठा नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहेत. आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटू लागले आहेत.
अशातच मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब केल्याने बड्या नेत्याने शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणावर २४ तारखेपर्यंत निर्णय झाला नाही. यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे बीडचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर यांनी राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय वेळेत झाला नाही, हा निर्णय घेण्यास विरोध कोण करत आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी समोर आणावे, अशी मागणी करत तळेकर यांनी राजीनामा दिला आहे. तळेकर यांच्यासोबत शिंदे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही देखील राजीनामा दिले असून आरक्षण आमच्या हक्काचे अशाप्रकारे शिवसेना कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्रातील मराठा समाज अतिशय बिकट आणि गरीब परिस्थितीतून वावरत आहे. मराठा समाजातील मुले आरक्षण न दिल्यामुळे आत्महत्या करत आहेत. जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे, असं परमेश्वर तळेकर यांनी म्हटलं आहे.