पुणे पोलीसांनी गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जमीनदारांचे रॅकेट उध्वस्त केलं आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी काही वकीलांच्या मदतीने बनावट जामीनदार तयार केले जात होते. हे बनावट जामीनदार आरोपींच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करून, खोटे आधारकार्ड, रेशनकार्ड आणि 7/12 उतारे तयार करत होते. बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपींना जामीन मिळवून दिले जात होते.
दरम्यान 4 जानेवारी 2025 रोजी लष्कर कोर्ट आवारात सापळा रचण्यात आला. यामध्येच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. आरोपींकडून 95 संशयित रेशनकार्ड, 11 संशयित आधारकार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे, मोबाईल हँडसेट आणि डिओ मोपेड असा एकूण 79,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी फासे टाकून आरोपींना जाळ्यात अडकवलं.
आरोपींची टोळी आधारकार्ड, शिधापत्रिका, सातबारा उतारे, तसेच संबंधित कागदपत्रे सादर करायची. शिधापत्रिकेवर बनावट सही, शिक्क्यांचा वापर करायचे. न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन कागदपत्रे मूळ असल्याचे भासवायचे. न्यायालयाची दिशाभूल करुन आरोपी गु्न्हेगारांना जामीन मिळवून द्यायचे. त्यामुळे अनेक नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न या टोळीने केला आहे.
दरम्यान, आरोपींनी बनावट रेशनकार्ड, आधारकार्ड याद्वारे न्यायालयातून अनेक आरोपींना आजपर्यंत जामीन मिळवून दिला आहे. त्यामध्ये न्यायालयातील काही वकिलांचा आणि कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालंय. त्यामुळे पोलीस सध्या अनेक अँगलने पुढील तपास करत आहेत.