महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात नेहमीप्रमाणे १५०० रुपये जमा होणार की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे मिळून ३००० रुपये मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार का आणि हप्त्याबाबत नेमकी काय अपडेट आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार की ३००० रुपये मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये म्हणजे एकच हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाला निधी मंजूर करण्यास सरकारने बुधवारी परवानगी दिली. लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये देण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेकडे वळवला. अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र महिलांना पैसे देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे.
३४४.६२ कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झाल्यानंतर आता दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. या पैशातून लाडक्या बहिणींना दिवाळी साजरी करता येईल आणि त्यांना घर खर्चामध्ये हातभार लागेल. सरकार नेहमी सणासुदीचे औचित्य साधत लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देत आले आहे. त्यामुळे यावेळी देखील सरकार दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना खूश करणार आहे. सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे कधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत अद्याप अधिकृत तारीख सांगण्यात आली नाही पण सरकार लवकरच याची घोषणा करेल.