देवळा : येथील देवळा -खर्डे रस्त्यावरील शिंदे वाडीतील एका बंद घराला आज दुपारी १ वाजता विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
या आगीत घरातील रोख रक्कम ३ लाख ६० हजार रुपयांसह घरातील संसार उपयोगी असे एकूण १४ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. देवळा नगरपंचातीचे अग्निशमन बंब वेळेत पोहोचल्याने कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दुपारी एक वाजेच्या सुमारास देवळा येथील शिंदे वाडीत राहणारे विनोद बाजीराव शिंदे यांच्या बंद घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यावेळी घरातून धूर येत असल्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच घटनास्थळी स्थानिक व इतरांनी धाव घेतली.
वीज वितरण कंपनीला याची कल्पना दिल्यावर येथे तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलीच स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी देवळा नगरपंचायतीचे अग्निशमन बंब वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ अनर्थ टळला. घरात आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील रोख रकमेसह मौल्यवान वस्तू यात जळून खाक झाल्याने शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या आगीत रोख रक्कम ३ लाख ६० हजार रुपये, सोने १ लाख ८० हजार, संसार उपयोगी वस्तू ५ लाख, टीव्ही ४५ हजार, फर्निचर १ लाख ५० हजार, सिलिंग व पियूईपी ४० हजार, लोखंडी कपाट ६० हजार, फ्रिज, फॅन आदी ५० हजार, पलंग ३० हजार असे एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा देवळ्याचे तलाठी उमेश गोपनारायण यांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.