नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अलीपूर भागातील एका पेंट फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि बाहेर पडू न शकल्याने ११ कामगारांचा यात होरपळून मृत्यू झाला.
याबाबत मिळालेलया माहितीनुसार, उत्तर दिल्लीच्या अलीपूर भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत ही घटना घडलीये. गुरुवारी सायंकाळी उशिरा मार्केटमध्ये भीषण आग लागली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर चारजण जखमी झालेत. ही आग इतकी इतकी भयानक होती, की आगीच्या ज्वाळा दूर अंतरापर्यंत दिसत होत्या. आगीमुळे एकच गदारोळ माजला होता. मृत कामगारांची ओळख अद्याप पटलेली नाहीये.
दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 22 अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. रात्री नऊच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू होतं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.