जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गेट्स यांनी नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत बिल गेट्स आणि नरेंद्र मोदी यांनी भारतासह जगाचं भविष्य, औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती, नोकऱ्या, भारताची पुढील वाटचाल, डिजीटल क्षेत्रात भारताची कामगिरी, भारतासह जगभरातील देशांसमोरील आव्हानं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर प्रदीर्घ चर्चा केली.
या चर्चेवेळी बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला की, एआयमुळे भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, एआयमुळे नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. भारत ही आव्हानं कशी पेलणार? भारत या आव्हानांचा कशा पद्धतीने सामना करणार आहे. यावर मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व, त्यामधून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर सविस्तर उत्तर दिलं. तसेच त्यांच्या डीपफेक व्हिडीओंचा दाखला देत ही आव्हानं कशी पेलता येतील यावर भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे खरं आहे की एआयने आपल्यासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. एआय ही खूप चांगली गोष्ट आहे. पंरतु, उत्तम प्रशिक्षणाशिवाय अशी गोष्ट एखाद्याच्या हातात दिली तर त्या गोष्टीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. मी एआयशी संबधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांशी बोललो.
त्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलोय की सुरुवातीच्या काळात तरी एआय जनरेटेड गोष्टींवर (एआयचा वापर करून तयार केलेली सामग्री, जसे की फोटो, व्हिडीओ, संगीत आणि डॉक्यूमेंट्स) वॉटरमार्क असायला हवा. ही सामग्री एआयच्या माध्यमातून बनवली असल्याचं लोकांना कळायला हवं. जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही. असं करणं काही वाईट नाही. ही गोष्ट केवळ एआय जनरेटेड आहे हे लोकांना सांगायलाच हवं. त्यामुळे त्या युजरला किंवा उपभोक्त्याला त्या गोष्टीची खरी किंमत कळेल.
दरम्यान मोदी म्हणाले, डीपफेक हे एआयमुळे निर्माण झालेलं एक मोठं आव्हान आहे. भारतासारख्या लोकशाही असलेल्या इतक्या मोठ्या देशात हल्ली डीपफेक सामग्री बनवली जातेय. माझे डीपफेक व्हिडीओदेखील मी पाहिले आहेत. कोणीतरी माझ्या आवाजात एखादी घाणेरडी गोष्ट बनवली आणि समाजमाध्यमांवर शेअर केली तर सुरुवातीला लोकांना ते खरं वाटेल.
त्यामुळे देशभरात मोठी आग लागेल, गदारोळ माजेल. त्यामुळे डीपफेक कॉन्टेंटचा मूळ सोर्स लोकांना समजला पाहिजे. अमुक-तमुक सामग्री एआयद्वारे बनवली आहे असं त्यावर लिहिलेलं असायला हवं. मला वाटतं की, कदाचित या गोष्टीची भविष्यात गरज पडणार नाही. परंतु, सध्या तरी आपण काळजी घेतली पाहिजे. एआयबद्दल किंवा डीपफेकबद्दल अमुक गोष्टी करायला हव्यात किंवा तमुक गोष्टी करू नयेत याची नियमावली तयार करायला हवी.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी नवी तंत्रज्ञानाबाबत दोघांमध्ये चर्चा केली. तसेच दोघांमध्ये आरोग्य, कृषी, हवामान बदलाविषयीही चर्चा झाली. 'मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही. पण लहान मुलांसारखं तंत्रज्ञान खूप आवडतं, असं नरेंद्र मोदी हे बिल गेट्स यांच्याशी चर्चा करताना म्हणाले. तसेच यावेळी मोदींनी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संशोधनासाठी २ लाख आरोग्य केंद्र बांधणार असल्याची माहिती दिली.
बिल गेट्स यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही. मी पाण्याच्या प्रवाहासारखा नवनवीन टेक्निक शोधत असतो. मला तंत्रज्ञान नेहमी आकर्षित करतं. मी या क्षेत्रातील जाणकार नाही. पण मला या विषयाची लहान मुलांसारखी उत्सुकता असते'.
तसेच, 'माझं नवं सरकार गर्भाशयाच्या कर्करोगावर संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांना निधी वाटप करेल, असेही त्यांनी सांगितलं. यावेळी तंत्रज्ञान हे कृषी, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावेल, असंही मोदींनी सांगितलं.
हरित उर्जेवरही झाली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांच्यावर हरित उर्जेवरही चर्चा केली. मोदी म्हणाले, 'मला सांगताना आनंद होत आहे की, भारत नवीकरणीय ऊर्जेमध्ये क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. आम्ही हरित हायड्रोजनमध्ये प्रगती करू इच्छित आहे. तमिळनाडूमध्ये मी हायड्रोजनने धावणारी बोट लाँच केली. या बोटचा मार्ग काशी ते अयोध्या ठेवण्याचा विचार करत आहे. तसेच माझं 'स्वच्छ गंगा' हे आंदोलन लोकांमध्ये पसरत आहे. या आंदोलनामुळे लोकांमध्ये चांगला संदेश पसरत आहे'.
स्टॅच्यू ऑफ युनिटीची चर्चा
बिल गेट्स यांना सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी भारतातील ६ लाख गावांतील शेतकऱ्यांकडून लोह गोळा केलं. या लोहाला वितळलं. त्यानंतर या लोहाचा उपयोग 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मध्ये वापर केला. तसेच मी प्रत्येक गावातून माती आणली, त्यापासून 'युनिटी वॉल' तयारी केली. यामागे एकतेची भावना आहे'.