नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जागा विकसित करण्याचा डेव्हलपमेंट करारनामा करून 28 कोटी रुपये घेऊनही जागा डेव्हलप न करता एका उद्योजकाची फसवणूक करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय कचरदास बेदमुथा (वय 59, रा. दत्तमंदिर चौक, नाशिकरोड) यांचे पंडित कॉलनीत कार्यालय आहे. बेदमुथा यांचा 1 हेक्टर 54 आर या क्रमांकाचा 419 नंबरचा प्लॉट आहे. हा प्लॉट विकसित करण्यासाठी फिर्यादी बेदमुथा हे डेव्हलपर्सचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.
अखेर आरोपी विजय जगन्नाथ राठी, कौशल्याबाई जगन्नाथ राठी, सुजाता सतीश मंत्री, अर्चना श्रीकुमार मालानी, श्रुती सुशांत लढ्ढा, आदिती प्रणय अग्रवाल, दीपक जगन्नाथ राठी, वृंदा अरविंद राठी, सुषमा बाळकृष्णा काबरा (सर्वांचे पूर्ण पत्ते माहीत नाहीत) या सर्वांनी संगनमत करून फिर्यादी बेदमुथा यांची भेट घेतली व त्यांना त्यांचा प्लॉट नंबर 419 याचे क्षेत्रफळ 1 हेक्टर 54 आर ही जागा विकसित करून देतो, असे बेदमुथा यांना सांगितले. त्यानुसार जागा विकसित करण्याचा डेव्हलपमेंट करारनामा करण्यात आला. त्यापोटी फिर्यादी बेदमुथा यांच्याकडून एकूण 28 कोटी 10 लाख 12 हजार 475 रुपयांची रक्कम स्वीकारली; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून व अनेक दिवस उलटूनही सदरचा प्लॉट डेव्हलप करून न देता फिर्यादी बेदमुथा यांची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार दि. 25 नोव्हेंबर 2008 ते दि. 11 जून 2023 या कालावधीत गोळे कॉलनीतील गिरधरवाडी येथे घडला. याबाबत फिर्यादी बेदमुथा यांनी आरोपींकडे डेव्हलपमेंटसंदर्भात दिलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर बेदमुथा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन पुरुष व सहा महिला अशा नऊ जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.