नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. बबनराव घोलप यांनी आठ महिन्यांपूर्वी शिवसेना सदस्यपदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता.
विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा जागा ठाकरे गटाने त्यांच्या पुत्र योगेश घोलप यांना दिली. त्यानंतर घोलप यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशची शिष्टाई सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोलप यांना नाशिक शहरातील महा विकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, माजी नगरसेवक भैय्या मणियार, तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या पुनरुत्थानासाठी घोलप यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे विचार ठाकरे यांनी व्यक्त केले.