चांदवड - चांदवड येथे केदा आहेर समर्थकांचा एल्गार मेळावा येथील मातोश्री लॉन्स येथे संपन्न झाला. या मेळाव्यास भुतो न भविष्यती अशी गर्दी होती. लॉन्सच्या ठिकाणी बसण्यास जागा नसल्याने लॉन्सच्या चारही दिशांनी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
यावेळी बोलतांना केदा आहेर यांनी म्हणाले की, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दि. 17 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन माङया नावाची पक्षश्रेष्ठीकडे शिफारस करीत असल्याची घोषणा करीत असून मी निवडणुकीतून माघार घेत आहे असे सांगीतले. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठी व केंद्रीय कमेटीने दि. 16 ऑक्टोबरलाच आ. डॉ. राहुल आहेर यांचे नाव यादीत घेतले होते. डॉ. राहुल आहेरावर हल्लाबोल करीत त्यांचे कपटी स्वरुप आता दिसले व जनतेलाही त्यांचे कपट दिसल्याने आज एवढी प्रचंड गर्दी तुम्ही या मेळाव्यास केली. मी येथे येण्यापुर्वी आमदारकी लढायची की नाही या विचारात होता मात्र आज येथील जनसमुदाय बघता मी भारावून गेलो आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी असेल तर मी मात्र निवडणुकीसाठी उभा राहीन.
मी आजपर्यंत देवळ्यातील जनतेसाठी काम केले. मात्र चांदवडकरांसाठी काहीच केले नाही. असे म्हणत त्यांनी खंतही व्यक्त केली. माझा भाऊ शांत, संयमी पण त्याचे कपटी रुप तुम्हाला आता दिसले असे म्हणत डॉ. राहुल आहेरांवर केदा आहेर यांनी गंभीर आरोप केला. मी सत्तेसाठी लाचार नाही. अशा अनेक खुर्च्या मी लोकांना दिल्या आहेत. अनेक नगरसेवक केले. सरपंच केले. आमदारही केले. जे आमदार झाले ते माझ्याच जिवावर झाले. काही लोक मला म्हणतात, याला जिल्हा परिषद दिली, जिल्हा बॅक दिली, अरे माझ्यामुळे ते आहेत. त्यांच्यामुळे मी नाही. माझ्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झाला तो जनतेला आवडला नाही. त्यासाठी जनता माझ्या पाठीवर हात ठेवण्यासाठी आज एवढय़ा मोठय़ा संख्येने आली आहे.
मी आज भारावून गेलो असे म्हणत केदा नाना यांच्या डोळ्यातून आश्रु आले. सर्व सामान्य जनतेसाठी, मजुर, गोरगरीबासाठी मी उमेदवारी करणार आहे. तुम्ही तुमचे मत माझ्या पदरात टाका, आता दिवस फक्त पंचवीस राहीले आहेत. मी आमदार नसून जनता आमदार आहे, असेही केदा आहेर यांनी सांगितले. जो भावाचा झाला नाही तो तुमचा काय होईल असे सांगुन माझा घात केला. याला पाच वर्ष जमीन कसायला दिली. पण हा तर सातबाऱ्यावर नाव टाकून मालकच झाला, अशा शब्दांत त्यांनी डॉ. आहेरांवर सडकून टीका केली. मी जे बोलतो तेच करतो. चांदवड व देवळा तालुक्यातील कांदा, पाणी प्रश्न, कांद्यावर प्रक्रिया उद्योग, औद्योगिक वसाहत, बेरोजगारांचा प्रश्न व इतर अनेक प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहील.
मी अधिकाऱ्याना गोड बोलून पाठीशी घालणारा नाही. अधिकाऱ्यावर वचक ठेवणारा माणूस असून माझ्या काळात कधीही डी.पी. जळाली तर पैसे लागणार नाही तसेच माझ्याकडे येण्यासाठी कोणाही मध्यस्थाची गरज नाही असे स्पष्ट शब्दात आश्वासन केदा आहेर यांनी एल्गार मेळाव्यात बोलतांना व्यक्त केले. जनतेच्या विश्वासावर व भरवशावर मी निवडणुक लढवित आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. एक महिला भगिनी परवीनबानो बागवान यांनी केदा आहेर यांचे डिपाझीट भरण्यासाठी आम्ही झोळी घेऊन त्यांचा फॉर्म भरु असे सांगताच उपस्थितांनी खरोखर झोळीत केली त्यात अनेकांनी दान टाकले.
यावेळी ह.भ.प. संजय महाराज शिंदे, सोग्रसचे माजी सरपंच व माजी सभापती भास्कर गांगुर्डे, प्रभाकर ठाकरे, प्रशांत ठाकरे, परवेजा बागवान, सागर पगार, संजय पवार, माया निरभवणे, संजय पाचोरकर, प्रशांत वैद्य यांची भाषणो झाली. मेळाव्यास सुनील शेलार, माणिक थोरे, प्रकाश देवढे, योगेश साळुके, भागवत जाधव आदिसह हजारो कार्यकर्ते, महिला, पुरुष तरुण मोठय़ा संख्येने उपस्थित होते.