२१ ऑगस्ट २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी एक लिंक पाठवून त्याद्वारे तीन जणांची 40 लाख 47 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी योगेश अशोक मेखा (वय 45, रा. ग्रीन कोर्ट अपार्टमेंट, गोविंदनगर, नाशिक) हे खासगी नोकरी करतात. दि. 28 मे रोजी जॉईंट प्रॉफिट प्लॅन, ग्रो कॅपिटल ग्रुप आणि मोतीलाल ओसवाल प्रा. वेल्थ ऑफिशिअल ग्रुप या व्हॉट्सॲप ग्रुपमधील शिवांश सिंग या नावाच्या अज्ञात इसमाने योगेश मेखा यांना व्हॉट्सॲप क्रमांकावरून लिंक पाठविली.
त्या लिंकच्या माध्यमातून अज्ञात इसमाने मेखा यांची एकूण 28 लाख 42 हजार रुपये व साक्षीदार प्रमोद साहेबराव पाटील यांना वेल्थ ग्रोथ डिस्कशन ग्रुप या व्हॉट्सॲप क्रमांकावरून मॅथ्यू ब्रेडली याने व जॉन स्मिथ या नावाच्या इसमाने व्हॉट्सॲप क्रमांकावरून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफ्याचे आमिष दाखवून 7 लाख 19 हजार रुपये, तसेच अन्य साक्षीदार निखिल घयासी यांना प्रो. मॅथ्यू ब्रेडली स्टॉक सेंटर या व्हॉट्सॲप ग्रुपमधील नयना व मॅथ्यू ब्रेडली या नावांच्या अज्ञात इसमांनी व्हॉट्सॲप क्रमांकांवरून पुन्हा एक लिंक पाठविली.
या लिंकचा वापर करून पुन्हा एकदा 4 लाख 86 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितली. अशा प्रकारे फिर्यादी मेखा यांच्यासह साक्षीदार साहेबराव पाटील व निखिल घयासी अशा तिघांना अज्ञात इसमांनी एकूण 40 लाख 47 हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले; मात्र बरेच दिवस होऊनही फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar