मागील काही दिवसांआधी बांगला देशात हिंदू महिला आणि बांधवांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्त काळ नाशकात सकल हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शुक्रवारी भद्रकाली, जुने नाशिक परिसरात हिंसक वळण लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी परिस्थिती निवळली. परिसरात शांतता असून दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले.
दरम्यान , शुक्रवारी जुने नाशिक भागात झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त कायम आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
भद्रकालीतील दग़डफेकीत पाच पोलीस अधिकारी आणि नऊ कर्मचारी जखमी झाले. रुग्णालयात जाऊन भुसे यांनी जखमींची विचारपूस केली. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद केले. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागून दगडफेक झाली होती. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली, असे प्रशस्तीपत्रक भुसे यांनी दिले.
शनिवारी भद्रकाली, दूध बाजार, बर्डी दगा परिसरात शांतता होती. या भागातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले. कालच्या घटनेनंतर या भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगड, विट तुकड्यांचा खच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हटवून साफसफाई केली.
कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सीसीटीव्ही चित्रणात जे सापडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे आरोप होत असून त्याचीही चौकशी होईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले्. आगामी काळात सर्वधर्मिय सणोत्सव सुरू होत असल्याने पोलिसांनी सतर्क रहावे. नागरिकांनी शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही भुसे यांनी केले.