गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाने पुन्हा एकदा नाशकात जोरदार कमबॅक केला आहे , गेल्या चार ते पाच दिवसापासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कमालीची वाढ झाली आहे. नाशिककरांचे पारंपरिक पुरमापक असलेली गोदावरीच्या पात्रातील दुतोंड्या मारुतीची मुर्ती कमरेपर्यंत पाण्यात बुडाली आहे सलग मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण 93.4 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, गंगापूर धरणातून सकाळी 8 वाजता 520 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला. तर दुपारी एक वाजेपासून 2 हजार 382 क्यूसेक, दुपारी 4 वाजता 3 हजार 900 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
आज सायंकाळी 6 वाजता 7424 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.