मुंबई : लोकसभेची सातारची हक्काची जागा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसाठी भाजपला सोडल्यानंतर अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यसभेची जागा मिळणार आहे. तसे आश्वासन भाजपने दिल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.
अजित पवार गटाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. गोयल भाजपकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गोयल जून २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आहेत. जर गोयल विजयी झाले तर ते राज्यसभेचा राजीनामा देतील आणि त्यांच्या राज्यसभा खासदारकीची शिल्लक असलेली चार वर्षे अजित पवार गटाच्या उमेदवाराला मिळतील ; पण गोयल यांचा पराभव झाला तर अजित पवार गटाला राज्यसभा कशी मिळणार, याबाबत स्पष्टता नाही.
साताऱ्याचाच आग्रह कशामुळे?
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार निवडून येत आहे. सध्या इथे राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत. मात्र, ते शरद पवार गटाबरोबर आहेत. असे असले तरी सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत जात अमित शाह यांची भेटही घेतली होती.