डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका
डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका
img
Dipali Ghadwaje
मुंब्रा :  फिरण्यासाठी म्हणून गेलेल्या परंतु परतीचा मार्ग विसरल्यामुळे डोंगरामध्ये अडकलेल्या पाच अल्पवयीन मुलांची विविध पथकांनी मिळून सात तासांनी सुखरुप सुटका केली. 

मुंब्र्यातील विविध ठिकाणी रहाणारी असहदूल शेख (वय१२),मोहम्मद पिंटू शेख (वय ११), मुन्ना शेख (वय ९) सर्व रहाणार दर्गा गल्ली, अमृत नगर तसेच ईशान शेख (वय १०,रा.आझाद नगर) आणि अमीर शेख (वय ११,रा.कौसा) ही पाच मुले शुक्रवारी संध्याकाळी बायपास रस्त्या जवळील खडी मशीन परीसरातील ३०० फूट उंच डोगरांवर फिरण्यासाठी गेली होती. परंतु ते परतीचा मार्ग विसरल्याने तेथे अडकली. 

याबाबतची माहिती रात्री ८ वाजून २० मिनिटांनी ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मुंब्रा अग्निशमन दलामार्फत मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी वाय. एम. तडवी, मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी हेमंत दिव, गणेश खेताडे, माजी विरोधी पक्ष नेते शानू पठाण, ठामपाच्या परिवहन समितीचे सदस्य शमीन खान, अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यावस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे (टीडीआरएफ) तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) सुशांत शेटी, स्थानिक पोलिस आणि गिर्यारोहक योगेश सद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

डोगरांवरील निसरडा भाग, पाऊस, दाट अंधार या सर्व कठीण परिस्थितीवर मात करुन सर्व पथकांनी संयुक्त प्रयत्न करुन शनिवारी मध्यरात्री ३ वाजता मुलांची सुखरुप सुटका करुन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना त्यांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group