नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- विजेचा सततचा लपंडाव, सणांच्या काळात खंडीत होणारा वीज प्रवाह, उघड्या डीपी, वीजेची दुप्पट बिले याच्या निषेधार्थ मनसेने महावितरणाच्या येथील मुख्य कार्यालयापुढे 'ट्यूब लाइट' फोडून आंदोलन केले. मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले.
शहर संघटक अॅड. नितीन पंडित, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, कामगार सेनेचे बंटी कोरडे, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, विनायक पगारे, मनविसे पदाधिकारी शशी चौधरी, उमेश भोई, नितीन धानापुणे, मीरा आवारे, भानुमती अहिरे, दत्ता कोठुळे, दीपक बोराडे, वैभव शिंदे, सौरव चव्हाणके, कृष्णा सोनार, संतोष सोळंके उपस्थित होते.
शहराच्या बहुतांश भागात वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. विजेचा लपंडाव दिवसभर सुरु असल्याने गृहिणींच्या कामात व्यत्यय येत आहे. टीव्ही, संगणक, फ्रिज, इस्तरी, वॉशिंग मशीन, गिझर आदी वस्तूंमध्ये बिघाड होत आहे. वेळेवर वीज बिल भरून देखील अखंड वीजपुरवठा मिळत नाही. वीज बिले वेळेत मिळत नाहीत. अव्वाच्या सव्वा बिले दिली जातात.
बिले भरूनही वीजपुरवठा तोडला जातो. बिलावर मीटर रिडींगचे फोटो व्यवस्थित नसतात. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांनी फोन केल्यास वीज कार्यालयाकडून उत्तर दिले जात नाही. खंडीत वीज पुरवठ्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. विजेचा लपंडाव न थांबविल्यास मनसे वीज बिल न भरण्यास नागरिकांना आव्हान करेल.