आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. येथील शेती सुधारण्यात गुरांचा मोठा वाटा आहे. हिंदू धर्मात अनेक सण आहेत, ज्यात आपण आपल्या जवळच्या गुरांची पूजा करतो. यापैकी एक म्हणजे बैल-पोळा सण आहे. यंदा हा बैल पोळा 2 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी आपले शेतकरी गायी आणि बैलांची विशेष सेवा आणि पूजा करतात.
हा सण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पोळा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. अवघ्या दोन दिवसावर शेतकऱ्यांचा सण म्हणजे बैल-पोळा येऊन ठेपला आहे.
यंदा पोळा २ सप्टेंबर रोजी असल्याने बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या सर्जा-राजाचा सण २ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. त्यामुळे वर्षभर शेतीच्या कामासाठी कष्ट करणाऱ्या बैलांना सजविण्यासाठीचे साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहे. अशातच बैलांना सजविण्याच्या साहित्याच्या दरात यंदा १५ टक्के वाढ झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान बाजारात साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करताना दिसून आले. यात गोंदे मोख्या मंगरू माळा कासरे, चाबुक, मोत्याच्या माळा, फुगे, चमकी, आदी साहित्याचा समावेश आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक घरात पूजा करण्यासाठी मातीचे बैलही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. बाजारात ही बैलजोडी ५० ते १०० रुपयांना विकली जात होती. या साहित्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
पाऊस चांगला झाल्याने उत्साह
दरम्यान यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे. परिणामी बैल सजावटीच्या साहित्य दरात वाढ झाली असली तरी शेतकरी वर्षभर आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा सण साजरा करण्यासाठी सरसावले आहेत.