भाजपला पुन्हा धक्का ! आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला
भाजपला पुन्हा धक्का ! आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून शरद पवार गट सध्या अक्शन मोडमध्ये आहे. निवडणुकीआधी शरद पवार गटाने भाजपला धक्क्यावर धक्के देत आह. शरद पवारांच्या  गटात सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. 

 समरजितसिंह घाटगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा आणखी एक नेता गळाला लावला आहे. भाजपचे माजी आमदार आणि आटपाडी खानापूरचे नेते राजेंद्र देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांची सांगलीमध्ये भेट घेतली आणि आपण भाजप सोडत असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. भाजपने आम्हाला शिवसेना शिंदे गटाला विकल्याचा आरोप राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केला आहे. तसंच खानापूर आटपाडीमधून आपण विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

2019 साली आटपाडी खानापूरमधून शिवसेनेचे अनिल बाबर निवडून आले होते. शिवसेनेतल्या बंडानंतर अनिल बाबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, पण काहीच महिन्यांपूर्वी अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला जाणार असल्यामुळे राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजप सोडत पवारांची तुतारी हातात घेतली आहे.


दरम्यान, विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी शरद पवार सांगली दौऱ्यावर आले आहेत. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. जयश्री पाटील या काँग्रेसच्या सांगलीच्या इच्छुक उमेदवार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group