नाशिक : जुने सिडकोतील लेखानगर येथे स्वागत कमान उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने ठेवलेल्या लाखो रुपयांच्या अवजड लोखंडी कमानी परस्पर चोरीचा प्रयत्न शिवसेना महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला.
नाशिक महापालिकेने या स्वागत कमानीसाठी ८० लाखांहून अधिक रकमेची तरतूद करून त्यातील बहुतांश रक्कम खर्च केली आहे. नाशिक महापालिकेने जुने सिडकोच्या प्रवेशाद्वार असलेल्या लेखानगर चौकात स्वागत कमान आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी ८० लाख रुपयांहून अधिक तरतूद गेल्या ५ ते सहा वर्षांपूर्वी केली होती.
त्यानुसार या ठिकाणी अवजड आणि हजारो किलो वजन असलेल्या लोखंडी कमानीचे भाग आणून टाकण्यात आले होते. त्याची रक्कम नाशिक महापालिकेने अदा केल्याचेही अंदाज पत्रकात दर्शविण्यात आले आहे. मात्र, नाशिक महापालिकेने अचानक हे काम बंद केले आणि कमानीचे लोखंडी सांगाडे लेखानगर येथेच पडून होते.
आज, अचानक अज्ञात व्यक्तींनी गॅस कटरच्या मदतीने या कमानीचे तुकडे कापून हे साहित्य आयशर कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-46-F-5126 (एमएच-४६ एफ ५१२६) ने पळविण्याचा प्रयत्नात होते.
शिवसेना महानगरप्रमुख आणि जुने सिडकोतील माजी नगरसेवक प्रविण तिदमे हे लेखानगर येथून जात असतांना त्यांना ही बाब लक्षात आले. त्यांनी तातडीने त्या अज्ञात व्यक्तींना विरोध केला आणि ही चोरी करत असल्याने त्याचे व्हिडीओ शूटिंगही केले.
प्रविण तिदमे यांच्या विरोधामुळे या चोरट्यांच्या टोळीने धूम ठोकली. महापालिकेच्या मालकीचे लाखो रुपयांच्या लोखंडी साहित्याची चोरी उधळून लावली आहे. प्रविण तिदमे महापालिकेकडे तक्रार करणार आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा