धक्कादायक प्रकार ! मुलीच्या निधनानंतर एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं
धक्कादायक प्रकार ! मुलीच्या निधनानंतर एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं
img
दैनिक भ्रमर
एका कुटूंबात मुलीचा मृत्यू झाला पण त्यांनतर त्या कुटुंबासोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. कारण मुलगी गेल्याचे दुःख तर या कुटुंबावर कोसळलेच होते परंतु मुलीचा मृत्यू हा एचआयव्हीमुळे झाला असल्याची अफवेनेमुळे  संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडला आहे. दरम्यान,  ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे

मिळालेल्या  माहितीनुसार, ‘मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली, तसंच गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं. कुणीही भेटायला जवळ येत नाही. आमच्यासोबतचे व्यवहारही लोकांनी थांबवले आहेत’, अशी आपबिती पीडित कुटुंबाने सांगितली आहे. तसंच या आरोपांमुळे घरातल्या महिलेने दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही कुटुंबाने केला आहे.

याप्रकरणी कुटुंबाने डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिपही दाखवली. ही ऑडिओ क्लिप पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. तुमच्या मुलीला एचआयव्ही होता, तिच्या अंत्यविधीला जवळ ज्या व्यक्ती होत्या, त्याची तपासणी करून घ्या, असं या ऑडिओ क्लिपमधली व्यक्ती म्हणत आहे. ही व्यक्ती पोलीस असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशी अफवा पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. ‘आमची मुलगी गेली, पण जवळचे लोकही भेटायला आले नाहीत. या अफवेमुळे कुणीही आमच्याजवळ येत नाही. आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिला आहे, सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे झालं आहे, आम्हाला न्याय द्या.’, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.

दरम्यान, पीडित कुटुंबाच्या आरोपावर बोलताना आष्टी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोलिसांना याबाबत विचारलं असता डॉक्टरांनी जे सांगितलं त्यासंदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी समजवून सांगण्यासाठी हे सांगितलं, दुसरा कोणताही हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group