मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्यासाठी माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अशातच आता उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.
“२३ जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार आहे”, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घेण्यात यावी अन्यथा आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचंही जानकर यांनी म्हटलं आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की , “ईव्हीएमच्या मुद्याला मारकडवाडीत गावातून सुरुवात झाली आणि तोच आक्रोश संपूर्ण माळशिरस तालुक्यात आहे. आता माळशिरस तालुक्यातील धानोरे या गावात देखील ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी १२०६ लोकांनी हात वरती करून मतदान केलं. पण त्या गावात मला ९६३ एवढेच मते दाखवण्यात आलेली आहेत. आता धानोरे गावातील १२०० लोकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत आणि धानोरे गावातील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. आता जर निवडणूक आयोग मतदानाची पडताळणी करणार नसेल तर २३ जानेवारी रोजी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे”, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.
मी (उत्तम जानकर) आणि बच्चू कडू आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच माझ्या मतदारसंघाची पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी आमची मागणी आहे. मात्र, जर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी मान्य केली नाही तर आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहोत. दिल्लीत देखील अशाच प्रकारचा ईव्हीएमचा विषय सुरु आहे. त्यामुळे आमच्याबरोबर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होतील”, असंही आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.