राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून काल म्हणजेच शनिवारी १९ जानेवारी रोजी महायुती सरकारने बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर राजकारणातील घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. या पालकमंत्री पदावरून काही मंत्र्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर असल्याची माहीती समोर येत आहे.
रायगडचे पालकमंत्रिपद आपल्याला मिळेल, या आशेवर बसलेले मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांना जोरदार धक्का बसला. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांच्याकडे रायगडच्या पालकत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गोगावले समर्थकांनी आक्रमक पवित्रा धारण करून सामूहिक राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यात आधीपासूनच वाद होता. सरकार आल्यानंतर आपल्यालाच पालकमंत्रिपद मिळेल, असे गोगावले छातीठोकपणे सांगत राहिले. परंतु शनिवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांनुसार आदिती तटकरे यांनी गोगावले यांना शह देऊन स्पर्धेत बाजी मारली.
आदिती तटकरे यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे सोपवल्यानंतर गोगावले यांचे कार्यकर्ते आणि समर्थक प्रचंड आक्रमक झालेले आहेत. शनिवारी रात्री कार्यकर्त्यांनी गोगावले यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर रविवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. जिल्हाप्रमुख घोसाळकरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करून राजीनामे देऊन आपली नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची दखल मंत्री गोगावले यांनी घेतली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी समजू शकतो पण तरीही पक्षशिस्तीचे आपण पालन करूया, असे सांगत गोगावले यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.