गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे. जीव घेणे हल्ले. मारामाऱ्या इतकेच काय तर हत्येसारखे गंभीर गुन्हे देखील सर्रासपणे घडत असतात. कधी कधी तर एकमेकांमध्ये झालेले वाद देखील इतके विकोपाला जातात कि त्यातून अनर्थ घडतात. अशीच एक धकाकदायक बातमी पुण्यामधून समोर आली आहे.
पुण्याच्या बाणेर भागातल्या हॉटेलमध्ये दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आढळलं आहे. या दोघांच्याही शरिरावर चाकूचे घाव घालण्यात आले होते, यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, दोघांचीही प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दोघंही सध्या बोलण्याच्या स्थितीमध्ये नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार टेम्पो चालक असलेला 39 वर्षीय व्यक्ती रविवारी त्याच्या पत्नीसोबत बाणेरच्या हॉटेलमध्ये राहायला आला होता. रविवारची रात्र हॉटेलमध्ये घालवल्यानंतर सोमवारी दोघांमध्येही जोरदार भांडण झालं, यानंतर पतीने पत्नीवर चाकूने वार केले, यानंतर पीडित महिला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडायला लागली. हा आवाज ऐकून हॉटेलचा स्टाफ खोलीच्या दिशेने धावत आला.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूमची बेल वाजवली, पण कुणीही दरवाजा उघडला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला तेव्हा पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने स्वत:वरही चाकू चालवला, यामध्ये पती आणि पत्नी गंभीर जखमी झाले. या सगळ्या प्रकारानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं.
पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे पती-पत्नी बोलण्याच्या स्थितीमध्ये नसल्यामुळे पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबाचा शोध घेतला. तेव्हा आरोपी पती मुंबईच्या चेंबूर भागात राहतो, अशी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीच्या आईची चौकशी केली, यानंतर तो टॅक्सी आणि टेम्पो ड्रायव्हर असल्याचं पोलिसांना कळालं.
काही दिवसांपूर्वी या दाम्पत्याने काही लोकांकडून कर्ज घेतलं होतं, पण त्यांना कर्ज फेडता आलं नाही, त्यामुळे ते पळून गेले. मध्य प्रदेशच्या इंदूरपासून ते अन्य ठिकाणी ते जाऊन आले आणि रविवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाले. एक रात्र पुण्यात घालवल्यानंतर सोमवारी त्यांच्यात वाद झाला, असं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. या दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? याचं कारण अजून समोर आलेलं नाही, पण याचा तपास पोलीस करत आहेत.