दिवसेंदिवस वाहनांच्या अपघाताच्या प्रमाणामध्ये चिंताजनक वाढ होत आहे.काही अपघात इतके भीषण असतात की या घटनेतील काही लोकांचा अत्यंत दुर्दैवी पणे मृत्यू होतो. अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. या अपघातात पोलीस भरतीची तयारी करणारे मुले धावत असताना एका एसटी बसने त्यांना धडक दिली आणि या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेलजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायक असून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत! दुर्दैवाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची आयुष्य आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहता एसटी महामंडळाकडून त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याची निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , बीड-परभणी मार्गावर पहाटे ६ वाजताच्या दरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुण मुलांचा एसटी बसची धडकेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी केलेल्या तपासात सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारी मुले चालकाला दिसली नाहीत, असे चालकाचे म्हणणे आहे. दुर्दैवाने या अपघातामध्ये त्या तीनही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बीड आणि परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बीडचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याशी चर्चा करून मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा नातेवाईकांना एसटीची दहा लाखांची तातडीची मदत दिली जाणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे . तसेच एसटी महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे.