मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील हे ३० मे पासून आंदोलनास सुरुवात करणार आहेत. जरांगे यांच्या या घोषणेनंतर अनेक घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांनी माध्यमांसमोर संवाद साधला.
यावेळी प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत महत्त्वाचं वक्तव्य करताना मागण्या मान्य न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.मराठा आरक्षणाशी संबंधित असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे ३० मे पासून आंदोलनास सुरुवात करणार आहेत. मात्र, त्याआधी प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
प्रसाद लाड म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. काही गैरसमजातून सध्या विषय निर्माण झाले आहेत, पण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घेतले पाहिजे, अशी विनंती मी त्यांना केली आहे. ३० मे ही आंदोलनाची तारीख योग्य नाही; सध्या कडक ऊन आहे आणि शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आहेत. त्यामुळे जरांगे दादांनी आंदोलन मागे घ्यावे आणि मला एक संधी द्यावी, अशी विनंती करण्यासाठी मी 'लहान भाऊ' म्हणून येथे आलो आहे."
जरांगे पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांवर बोलताना लाड म्हणाले, "दादांच्या ७ ते ८ प्रमुख मागण्या आहेत, त्या मी सविस्तर समजून घेणार आहे. आरक्षणाचा हत्ती गेला असून आता फक्त शेपूट राहिले आहे. या मागण्या घेऊन मी मंत्रिमंडळ उपसमिती आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करेन. मी अनेक महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन आलो आहे. यापुढे जरांगे पाटील यांना आंदोलन करावे लागणार नाही, याच भावनेतून मी काम करेन. मी भगवद्गीतेतील सार घेऊन आलो असून, मला युद्ध पेटवायचे नाही तर समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत, असेही त्यांनी म्हटले.