गेल्या महिन्यात महाराष्ट्रात चांगलाच उकाडा झाला होता. उष्णतेने उकडून निघालेल्या महाराष्ट्राला आता मात्र थंडाव्याची चाहूल लागली आहे. आता लवकरच राज्यात पावसाचे आगमन होणार असून वादळी वाऱ्यांसह गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनआधी महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं धुमशान सुरू आहे. ताशी 30-60 किमीच्या वेगाने वारा, विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांत गारपिटीचा धोका आहे.जूनच्या सुरुवातीलाच कोकणात हवापालट झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही काळात उष्ण आणि दमट हवामानाने घामटा काढला होता.
आता मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आर्द्रता 65-80 टक्क्यांपर्यंत राहील.
मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस वादळी पावसाचा इशारा आहे. आज ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह गडगडाटी पाऊस होईल. तर काही ठिकाणी गारपिटीचा धोका आहे. पुणे, सातारा परिसराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमानात घट झाली असून आज 34-36 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
मराठवाडा परिसरात देखील उष्णतेच्या लाटेनंतर वादळी पावसाचं संकट घोंघावत आहे. आज कमाल तापमान 35-38 अंशांवर राहील. छत्रपती संभाजीनगर,
उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस वादळी पावसाचा धोका असून 72 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव परिसरात ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह गडगडाटी पाऊस होईल. कमाल तापमानात घट झाली आहे.
उष्णतेच्या लाटेनंतर विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचं तुफान सुरू आहे. आज पुन्हा ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह गडगडाटी पाऊस होईल. कमाल तापमान 38-42 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. नागपूर, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट असेल.
एकंदरीत, महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. पण हवामानात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल. मान्सूनसाठी 5-10 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. एकूण सरासरीपेक्षा जून महिन्यात कमी पाऊस राहील. वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.