नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील नामांकित टीसीएस कंपनी अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ, छळवणूक आणि सक्तीने धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित व गर्भवती असलेल्या निदा खान हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात यावर युक्तिवाद झाला असून, न्यायालय आता १२ जून रोजी आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे.
या धक्कादायक प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. यातील सर्वच गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आता दोषारोपपत्र दाखल केले आहे.
नाशिकमधील टीसीएस या आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ आणि सहकाऱ्यांविरोधात गंभीर तक्रार दाखल केली होती. कंपनीत काम करणाऱ्या काही तरुणी व महिलांना सातत्याने मानसिक त्रास देणे, त्यांचा लैंगिक छळ करणे आणि त्यांचे ब्रेनवॉश करून इस्लाम धर्मात परिवर्तन करण्यासाठी दबाव आणल्याचे धक्कादायक वास्तव या तक्रारीतून समोर आले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने एकूण गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपासासाठी शासनाने विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान ही पोलिसांना गुंगारा देत होती. सुमारे ४० दिवस ती फरार होती. यादरम्यान तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने २ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त सापळा रचून अत्यंत गुप्तपणे कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर येथील एका फ्लॅटमधून अखेर निदा खानला बेड्या ठोकण्यात आल्या. निदा खान हिचा मुक्काम नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. तिने नियमित जामिनासाठी नाशिकरोडच्या अतिरिक्त जिल्हा व न्यायालयात अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आता १२ जून रोजी तिला जामीन मिळणार की तिचा कारागृहातील मुक्काम वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.