सुट्टीचा दिवस म्हंटल की कोणालाही आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवावा, फिरायला जावे असे वाटते . मात्र एका कुटुंबासाठी हाच सुट्टीचा आनंद काळ बनून आला आहे. सुट्टीचा आनंद घालवण्यासाठी धरणावर गेलेल्या गर्भवती महिलेसह तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना नाशिकमधून समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा आणि मृतांच्या निवासी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , नाशिकच्या प्रसिद्ध काश्यपी धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील दोन सदस्य आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन निष्पाप मुले अशा चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिकमधील मखमलाबाद नाका परिसरातील रहिवासी सचिन थोंबरे हे आपल्या कुटुंबासह आणि शेजाऱ्यांसह रोजच्या धावपळीतून विरंगुळा मिळावा म्हणून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काश्यपी धरण परिसरात आले होते. यावेळी धरणाच्या निसर्गरम्य काठावर फिरत असताना अचानक पाय घसरल्याने एक जण पाण्यात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही एकामागून एक खोल पाण्यात बुडाले.
या मृतांमध्ये सचिन थोंबरे, त्यांची गर्भवती पत्नी रोहिणी थोंबरे आणि त्यांच्या शेजारी राहणारी दोन लहान मुले यांचा समावेश आहे. एकाच वेळी घरातील दोन मुख्य व्यक्ती आणि शेजारील दोन लहान मुले गमावल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेवेळी परिस्थितीतील एका स्थानिक महिलेने प्रसंगावधान दाखवले. यावेळी थोंबरे दांपत्य आणि इतर मुले पाण्यात बुडत असताना आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यावेळी त्या महिलेचे लक्ष थोंबरे दाम्पत्याच्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीकडे गेले. ही निष्पाप चिमुरडी परिस्थितीची जाणीव नसताना धरणाच्या कडेला जोरदार लाटांच्या दिशेने पावले टाकत होती. यावेळी क्षणभराचाही विलंब न करता, त्या महिलेने देवदूतासारखे धावत जाऊन चिमुरडीला उचलले. त्यानंतर तिला सुरक्षित ठिकाणी आणले. या महिलेच्या तत्परतेमुळे या संपूर्ण दुर्घटनेत थोंबरे कुटुंबातील त्या निष्पाप मुलीचा जीव वाचला आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि पोहण्यात पटाईत असलेल्या स्थानिक तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तरुणांनी जीवाची परवा न करता तात्काळ खोल पाण्यात उड्या मारल्या. तसेच बुडलेल्या चौघांनाही बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू केली. स्थानिक तरुणांच्या प्रयत्नांमुळे चौघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.