पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.”
पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.”
img
Nandini khandare More


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेतीच्या सात-बारा उतार्‍यावरून हक्कसोड पत्रान्वये बहिणीचे नाव कमी करण्याऐवजी बहीण व तक्रारदार या दोघांचीही नावे कमी करून तक्रारदाराचे नाव पुन्हा लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना देवळा तालुक्यातील खामखेडा येथील तलाठी पप्पू काशीनाथ सोनकांबळे (वय 46, मूळ रा. रेणुका माता सोसायटी, देवळाली कॅम्प, नाशिक) व त्याचा खासगी सहकारी प्रशांत दावल सोनवणे (वय 24, रा. खामखेडा) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून, त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, की खामखेडा शिवारातील एका शेती गटातून हक्कसोड पत्रान्वये बहिणीचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराने तलाठी सोनकांबळे यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार फक्त बहिणीचे नाव कमी करण्याऐवजी तलाठ्याने बहीण व तक्रारदार अशा दोघांचीही नावे सात-बारा उतार्‍यावरून कमी केली. याबाबत तलाठ्यांकडे चौकशी केली असता तक्रारदाराचे नाव पुन्हा लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. यासाठी तलाठी सोनकांबळे याने यापूर्वीच एक हजार रुपये स्वीकारले होते. दि. 22 मे रोजी दुपारी साडेतीन वाजेनंतर उर्वरित पाच हजार रुपये घेण्यासाठी तलाठी सोनकांबळे हे देवळा येथील वाजगाव रोडवरील टीव्हीएस मोटारसायकल शोरूमसमोर आले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले.

त्यानंतरही तलाठी सोनकांबळे यांनी शासकीय वाहनात बसलेले असताना लाचेची रक्कम खिशातून गाडीबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 12, तसेच भारतीय न्याय संहिता कलम 238 व 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे


पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एकनाथ पाटील, हवालदार योगेश साळवे, कॉन्स्टेबल चेतन शेवाळे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी तलाठी सोनकांबळे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी या करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group