धक्कादायक  ! 13 महिलांवर वाघाचा हल्ला, 4 जागीच ठार; कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! 13 महिलांवर वाघाचा हल्ला, 4 जागीच ठार; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली असून तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला. गुंजेवाही परिसरातील जंगलात 13 महिला एकत्र तेंदूपत्ता तोडत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला असून इतर महिलांनी जीव वाचवण्यासाठी जंगलात सैरावैरा धाव घेतली.

हल्ल्यानंतर एक महिला कसाबसा जीव वाचवत गावात पोहोचली आणि तिने आरडाओरड करत गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही ग्रामस्थ जंगलात धावले असता चार महिलांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये कवडूबाई मोहुर्ले, अनुबाई मोहुर्ले, सुनिता मोहुर्ले आणि संगीता चौधरी यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाघाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीही सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत अनेक नागरिकांचा बळी गेला असल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group