बिहारमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बिहारमधील रोहतास जिल्हा येथील सासारामहून आरा मार्गे पाटणाच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनला अचानक आग लागली. या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली असून मोठी दुर्घटना टळली. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
डब्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा उसळताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धाडधाड उड्या मारत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण बोगीला वेढलं. प्लॅटफॉर्मवर आरडाओरडा, गोंधळ आणि धावपळ सुरू झाली होती. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. ट्रेनच्या डब्याला लागलेल्याआगीमुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केलं आणि पाहता पाहता संपूर्ण बोगी आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. यामुळे प्रचंड गदारोळ माजला होता.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर थोड्याच वेळात, संपूर्ण डब्यात धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, सुदैवाने प्रवाशांना वेळेवर बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
रेल्वेच्या डब्याला लागलेल्या आगीच्या या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी आणि प्रवाशांनी रेल्वे व्यवस्थापनाच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या रेल्वे स्थानकावर पुरेशा अग्निशमन यंत्रणांचा अभाव असल्यामुळे सुरूवातील आगीवर लगेच नियंत्रण मिळवता आलं नाही आणि ती वाढली. जर पाणी आणि अग्निशामक यंत्रांचा वेळेवर वापर केला असता, तर बरेचसे नुकसान टाळता आले असतं, असंही काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
एवढंच नव्हे तर ट्रेनच्या रिफिलिंगच्या पाईपलाईनमध्ये पाणी नव्हतं, शिवाय, स्टेशनवरील अनेक अग्निशामक सिलिंडरमधील गॅस संपला होता, असंही स्थानिकांनी सांगितलं. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये सुरूवातील बराच अडथळा आला. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे आणि सुरक्षा उपायांच्या अभावामुळे आग वेगाने पसरली आणि एक संपूर्ण डबा जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहाणी झाली नाही. असं असलं तरीही रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीच्या डब्याला आग लागल्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.