सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरणाने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत असून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या प्रकरणात लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना नीट युजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातून अटक केली आहे. रविवार, 17 मे 2026 रोजी सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
परीक्षेपूर्वीच पेपर हस्तगत: तपासात असे निष्पन्न झाले आहे की, परीक्षेच्या आधीच म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजी मोटेगावकर यांनी नीट युजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीत, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये या परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले होते.
परीक्षा पार पडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रश्नपत्रिका डिलीटकेल्याचे तपासात समोर आले आहे. ही प्रश्नपत्रिका त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना पुरवल्याचा संशय आहे. मात्र, ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले गेले, त्यांची नावे सांगण्यास मोटेगावकर यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना टाळाटाळ केली.