राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता मोठी बातमी समोर येत आहे. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे आंदोलन पेटलं आहे. आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मात्र हा मोर्चा काढू नये यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टींसहीत आंबा बागायतदार उत्पादक अध्यक्षांना मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली होती, मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे वर्षा बंगल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन चिघळले आहे.
आज वर्षा बंगल्याच्या परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आंदोलक करणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, प्रमुख नेते ताब्यात घेतल्यामुळे आता हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.