NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट; शुभम खैरनारच्या भावाबाबत नवी माहिती समोर
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट; शुभम खैरनारच्या भावाबाबत नवी माहिती समोर
img
Nandini khandare More


नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात नाशिकमधून शुभम खैरनारला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून आता या प्रकरणात आणखी  एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही  माहिती शुभमच्या भावासंदर्भात  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम खैरनारचा भाऊ भावेश याच्याकडे गावठी पिस्तूल आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खैरनार कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भावेशकडे हे पिस्तूल कशासाठी होते? त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात होता? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान , मंगळवारी  पोलिसांनी  शुभम खैरनारला ताब्यात घेतले. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने केस कापून आपला चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जुन्या छायाचित्रांची तुलना आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी त्याची ओळख पटवली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शुभम खैरनारने पुण्यातील एका संशयिताकडून १० लाख रुपयांत प्रश्नपत्रिका विकत घेतली होती. त्यानंतर ती हरियाणातील एका व्यक्तीला १५ लाख रुपयांना विकून ५ लाख रुपयांचा नफा कमावल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण व्यवहार एनक्रिप्टेड मेसेंजर ॲपद्वारे करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

पोलिस तपासात असेही समोर आले की, आरोपींनी प्रश्नपत्रिका मोबाईलने स्कॅन केली नव्हती. पकड टाळण्यासाठी त्यांनी हाय-डेफिनिशन पोर्टेबल स्कॅनरचा वापर केला होता.स्कॅन केलेल्या प्रती नंतर टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया ॲप्सवरून शेअर करण्यात आल्या.

तपासकर्त्यांच्या मते, या प्रकरणामागे मोठे देशव्यापी नेटवर्क कार्यरत होते. मनीष यादव हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे, तर राकेश मांडवारिया याच्यावर प्रश्नपत्रिका वितरित केल्याचा आरोप आहे. राजस्थान एसओजीने या दोघांसह आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. मनीष यादवला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group