नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या मनाला चटका लावणाऱ्या घटनेनंतरही लहान मुलीनवर अत्याचारच प्रयत्न करण्यात आल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान आता बीड जिल्ह्यातुन अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे .
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर तिच्या घरातच अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून नराधमावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेची आई कामावर गेलेली होती, तर तिचे वडील घरात आजारी अवस्थेत होते. याच संधीचा फायदा घेत संशयित आरोपीने अत्यंत क्रूर कट रचला. पीडित मुलीचा 5 वर्षांचा मोठा भाऊ घराबाहेर खेळत असताना, आरोपीने त्याला खाऊ घेण्यासाठी पैशांचे आमिष दाखवून दुकानात पाठवले. त्यानंतर एकट्या असलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला आपल्या घरात बोलावून घेतले आणि दरवाजा आतून बंद करून घेतला.
काही वेळाने मुलगा दुकानातून परतला, तेव्हा त्याला बहीण दिसली नाही. त्याने तातडीने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी बाहेर येऊन शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे त्यांना दिसले. संशय आल्याने त्यांनी जोरजोरात आवाज देऊन दार उघडण्यास भाग पाडले. दार उघडताच संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी आरोपीने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाकडून अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य घडल्याने केज तालुक्यात संतापाची लाट उसळली असून नराधमावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.