देवळा (भ्रमर वार्ताहर) :- दहावीचा निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व पालकांच्या आयुष्यातील उत्कंठेचा क्षण; मात्र यंदाच्या निकालात एका अनोख्या योगायोगाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील रहिवासी व नामपूर येथील माध्यमिक शिक्षक तुषार पाटील यांची जुळी मुले प्रणीत व प्रणव या जुळ्या भावंडांनी शालांत परीक्षेत अगदी सारखेच 96 गुण मिळवत यशाचे अनोखे शिखर सर केले आहे.
बागलाण एजुकेशन संस्थेच्या बागलाण इंग्लिश मिडीयम येथे शिकत असलेले प्रणीत व प्रणव तुषार पाटील ह्या जुळया भावंडानी सोबत दहावीची परीक्षा दिली आणि नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत दोघांनाही 96 टक्के त्याचबरोबर हिंदी व गणित या विषयात देखील तंतोतंत समान गुण मिळाले आहेत.
अनेकांना वाटते की जुळ्या भावंडांमध्ये गुणांची स्पर्धा असते, मात्र या दोघांच्या बाबतीत चित्र वेगळे होते.एकाला एखादा विषय कठीण वाटला, तर दुसरा तो सोपा करून सांगायचा.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत दोघांचे वेळापत्रक जवळपास सारखेच होते.आम्ही दोघांवर कधीही एकमेकांपेक्षा जास्त गुण मिळवण्याचे दडपण आणले नाही,“ असे त्यांचे पालक तुषार पाटील व रोशनी पाटील या पालकांनी अभिमानाने सांगितले.
-