सोयाबीन उत्पादकांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोयाबीनला पाच वर्षांतील हा सर्वोच्च दर मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी ही सुखावणारी बातमी आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे.
बाजार समितीत सोयाबीनला तब्बल ७,१४५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने गेल्या पाच वर्षांतील हा सर्वोच्च दर मानला जात आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांपेक्षा साठेबाज व्यापारी आणि मोठ्या शेतकऱ्यांनाच अधिक होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून सुरू आहे.
शेतकऱ्यांकडे माल संपल्यानंतर दरवाढ
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांच्या गोदामात माल होता, तेव्हा बाजारात योग्य दर मिळत नव्हता. आर्थिक अडचणी आणि खर्च भागवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कमी भावातच सोयाबीन विकून टाकले. आता दरात मोठी तेजी आली असली, तरी बहुतांश शेतकऱ्यांची कोठारे रिकामी झाली आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, सोयाबीन तेलाची वाढती मागणी आणि देशांतर्गत बाजारात कमी आवक यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनने सात हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.
सध्या बाजार समितीत दररोज १६० क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक होत आहे. आगामी काळात दर स्थिर राहिले, तर बाजारातील आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.