राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता अनेक निर्णय राज्यसरकारकडून घेण्यात येत आहेत. दरम्यान, हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एटीएफवरील व्हॅटमध्ये 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 16 विमानतळांवरून प्रवास करणार्या 75 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विमान कंपन्यांकडून व्हॅट कमी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्यात आले होते. त्यानंतर केंद्राकडून अधिक प्रमाणात व्हॅट आकारणाऱ्या राज्यांना हा कर कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा व्हॅट 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
दरम्यान , व्हॅटमध्ये करण्यात आलेली ही कपात राज्यातील सर्व विमानतळांवरील उड्डाण संचालनाला मदत करणार आहे. मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फायदा होणार आहे. जागतिक स्तरावरील आव्हानांमुळे विमान भाड्यात वाढ होण्याचा दबाव असतानाही, या निर्णयामुळे विमान तिकिटांचे दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.