UPSC विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ६ दिवसांवर म्हणजेच २४ मी रोजी UPSC पूर्व परीक्षा होणार आहे. त्या आधीच यासंदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आता प्रथमच UPSC पूर्व परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका परीक्षा झाल्यानंतर लगेच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांची पडताळणी करता येणार असून चुकीच्या उत्तरांवर आक्षेप घेण्याची संधीही मिळणार आहे.
दरम्यान , UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी होणार आहे. आयोगाने सांगितले की, परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर लगेच उत्तरतालिका जाहीर करण्याची मागणी करत होते. आतापर्यंत UPSC अंतिम निकाल लागल्यानंतरच उत्तरतालिका प्रसिद्ध करत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरांमध्ये चूक आहे का? हे समजत नव्हते. आता मात्र परीक्षा झाल्यानंतरच उत्तरतालिका उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तात्पुरती उत्तरतालिका आल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या गुणांचा अंदाज घेता येईल. तसेच ते मुख्य परीक्षेची तयारी करायची की पुढील वर्षाच्या पूर्व परीक्षेची तयारी सुरू करायची, याचा निर्णय लवकर घेता येईल. दरवर्षी सुमारे ५ लाख विद्यार्थी पूर्व परीक्षा देतात. त्यापैकी फक्त १२ ते १५ हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.
३१ मेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार
UPSC ने सांगितले की, तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन आक्षेप नोंदवता येतील. यासाठी आयोगाने “QPREP” हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. हे पोर्टल UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
आक्षेपासाठी तीन पुरावे आवश्यक
विद्यार्थ्यांना कोणत्याही उत्तरावर आक्षेप घ्यायचा असल्यास त्यांना योग्य उत्तराचा दावा करताना तीन विश्वासार्ह पुरावे द्यावे लागतील. तसेच छोटेखानी स्पष्टीकरणही द्यावे लागणार आहे. त्यानंतर विषय तज्ज्ञांची टीम सर्व आक्षेपांची तपासणी करणार आहे.
UPSC ने स्पष्ट केले की, आलेल्या प्रत्येक आक्षेपाचा सखोल अभ्यास केला जाईल. तज्ज्ञ पुरावे तपासून संबंधित प्रश्नाच्या उत्तराची अचूकता पडताळतील. सर्व आक्षेपांचा विचार केल्यानंतरच अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. तसेच , UPSC चे अध्यक्ष अजय कुमार यांनी हा निर्णय “नवीन सुरुवात” असल्याचे म्हटले आहे. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जबाबदार आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.