नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना अटक झाली केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मांढरे यांच्या विषयी काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार ,संशयित आरोपी मनीषा मांढरे हिला न्यायालयाने १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मात्र, कोठडी मिळताच मनीषा मांढरेच्या चौकशीतून अशी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीने सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. मनीषा मांढरे हिने पेपर लीक करण्यासाठी जी अजब युक्ती वापरली, त्यामुळे सीबीआयच्या तपासात आता मोठे तांत्रिक पेच निर्माण झाले आहेत. मनिषा विरोधात सीबीआयला भक्कम पुरावे शोधावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे हिची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र आहे. गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्या एकच विषय शिकवत आहेत. त्यामुळे त्यांची विषयावरील पकड मजबूत होती. याच गोष्टीचा गैरफायदा घेत तिने 'नीट'च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न कोणत्याही कागदावर न लिहिता थेट आपल्या डोक्यात फीट केले. सर्व प्रश्न तोंडपाठ असल्याने तिने कोणताही छापील किंवा डिजिटल पुरावा मागे ठेवला नाही. प्रश्न डोक्यात साठवून तिने ते थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. व्हॉट्सॲप चॅट, मेसेज किंवा कागदपत्रांची कोणतीही पाऊलखूण नसल्यामुळे सीबीआयला आता तिच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करताना प्रचंड अडचणी येत आहेत.
या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश नीट पेपरफुटीतील अन्य एक आरोपी मनीषा वाघमारे हिच्या अटकेनंतर झाला. वाघमारेने सीबीआयच्या कडक चौकशीत थेट मनीषा मांढरेचे नाव घेतले, ज्यावरून सीबीआयने मांढरेला बेड्या ठोकल्या. मांढरेविरोधात कोणताही थेट लिखित पुरावा नसल्याने आता सीबीआयचे विशेष तपास पथक तिच्या घराची, डिजिटल गॅजेट्सची आणि लिखित साहित्याची कसून झडती घेत आहे. पुरावे नष्ट केले की आणखी काही दडवून ठेवले, याचा शोध आता केंद्रीय यंत्रणा घेत आहे. मनिषा मांढरेविरोधात भक्कम पुरावे शोधणे हे मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिक्षिका मनिषा मांढरे हिचं महाविद्यालयातून निलंबन करण्यात आले आहे. . पुण्याच्या शिवाजीनगर येथील नामांकित 'मॉडर्न महाविद्यालया'च्या प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन मांढरे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. मनिषा मांढरेचं नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.