गेल्या काही दिवसांपासून अनेक दुःखद घटना कानावर येत असून मोठं मोठया दुर्घटना सात्तत्याने घडतच आहेत. दरम्यान आता एक अशीच दुर्दैवी घटना बिहारमधून समोर आली आहे. 15 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली असून त्यात 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली आहे.
बिहारची राजधानी असलेल्या पाटणाजवळील गंगा नदीत गुरुवारी पहाटे बोट उलटल्याने भीषण अपघात घडला. ही बोट उमानाथ घाटाजवळ भाजीपाला घेऊन परतत होती, त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट नियंत्रणाबाहेर जाऊन नदीच्या मध्यभागी उलटली. या बोटीत सुमारे १५ ते १६ जण स्वार होते, ज्यामध्ये महिला आणि मुलींची संख्या अधिक होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. तर ७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप या बोटीतील ६ ते ७ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूमगंज बिंद टोली येथील रहिवासी असलेले हे लोक नेहमीप्रमाणे गंगा नदी पलिकडे असलेल्या समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर येथील सुलतानपूर दियारा येथे गेले होते. तेथे शेतीची कामे उरकून या महिला सकाळी ५.४५ च्या दरम्यान भाजीपाल्याने भरलेल्या लहान होडीतून ते उमानाथ मंदिराच्या घाटाकडे परतत होते. हे लोक रोज सकाळी दियारा भागातून भाजी आणून उमानाथ मंदिर परिसरात विकायचे. मात्र गुरुवारी सकाळी नदीत अचानक वारा सुटला. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट एका बाजूला कलंडली आणि काही कळण्यापासूनच ती खोल पाण्यात शिरली. बोट उलटताच नदीत एकच आरडाओरडा आणि आक्रोश सुरू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. ज्यांना पोहता येत होते ते स्वतः पोहून बाहेर आले, तर काहींना स्थानिकांनी वाचवले. या अपघातात आतापर्यंत ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटली आहे. यात २ महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण मासूमगंज बिंद टोली येथील रहिवासी होते.